आश्चर्यच ! चोराने चोरी केलेले तब्बल तीन तोळे सोन्याचे दागिने केले परत ;सोबत लिहिली सॉरी ची चिट्ठी

    दिनांक : 10-Jan-2022
Total Views |
नाशिक : देशात रोज कुठे ना कुठे चोरीच्या घटना घडत असतात. कोणाची गाडी, कोणाचे सोने तर कोणाचे पैसे चोरी होत असतात. एकदा चोरीला गेलेली वस्तू परत मिळण्याची कधीच शक्यता नसते. परंतु, एखाद्या चोरानेच चोरी केलेला तुमचा एेवज परत आणून दिला तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल ना. अशीच एक घटना समोर आली आहे. चोराने चोरी केलेले तब्बल तीन तोळे सोन्याचे दागिने परत केले आहेत. एवढेच नाही तर दागिने परत करताना या चोराने चिठ्ठी लिहून चक्क माफीसुद्धा मागितली आहे.
 
 

gold1
 
 
ही घटना नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. जेलरोड परिसरात राहणाऱ्या शरद साळवे यांच्या घरून शनिवारी 3 तोळे दागिने चोरीला गेले होते. त्यांनी याबाबत घरफोडी झाल्याची तक्रार जेलरोड पोलीस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी या चोरीचा तपासही सुरू केला होता. घटनास्थळी पोलीस शोध घेत असताना साळवे यांच्या घराच्या छतावर चोरीला गेलेल्या सोन्याची बॅग आणि त्यासोबत एक चिठ्ठी पोलिसांना सापडली. या चिठ्ठीत चोरोने चोरी केल्याबद्दल माफी मागितली आहे.
"तुमच्या गल्लीतीलच एक माणूस, मला माफ करा, मी तुमची बॅग घेतली आणि पत्र्यावर टाकली. मला पैशांची गरज होती. पण मी ते घेतले नाहीत. सॉरी मला माफ करा," अशी चिठ्ठी लिहून चोरी केलेला मुद्देमाल चोराने केला परत केला आहे.
पोलिसांनी साळवे यांच्या तक्रारीनुसार अनोळखी संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चिठ्ठीतील मजकुरावरूनही ही चोरी तक्रारदार साळवे यांच्या गल्लीत राहणाऱ्या कोणीतरी केल्याचा पोलिसांना संशय आहे. जेलरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.