गजानना श्री गणराया। आधी वंदू तुज मोरया
मंगलमूर्ती श्री गणराया। आधी वंदू तुज मोरया
देशभरात शुक्रवारपासून गणेशोत्सव थाटात साजरा केला जात आहे. सर्व देवतांमध्ये गणपती अशी देवता आहे की, घरी देवघरापासून घरातील प्रत्येक कोपर्यापर्यंत, मग ते अभ्यासाचे टेबल असो किंवा बैठकीची खोली, सर्वत्र त्या विनायकाची प्रतिमा दिसते. पण तुम्हाला माहीत आहे का की, ज्याची भारतात घरोघरी पूजा केली जाते, त्या गणपतीची देशातच नव्हे तर परदेशातही पूजा केली जाते. या यादीत पहिले नाव आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिकदृष्ट्या अतिप्रगत अशा जपानचे आहे. जपान या देशात भगवान श्रीगणेशाची सुमारे 250 मंदिरे आहेत. जपानमध्ये, लोक गणपतीचे एक रूप असलेल्या ‘कंगिटेन’ची पूजा करतात.
भगवान कंगिटेन देखील बाप्पा मोरयांप्रमाणे आनंद, शांती आणि समृद्धी देतो. आजपासून अनेक शतकांपूर्वी मध्य आशियामध्ये श्रीगणेशाची पूजा केली जात होती, असे नामवंत ऑक्सफर्ड पब्लिकेशनने पुराव्यांसकट सिद्ध केले होते. एवढेच नव्हे, तर म्यानमार, अफगाणिस्तान, श्रीलंका, नेपाळ, थायलंड, चीन, मंगोलिया, व्हिएतनाम, बल्गेरिया, अमेरिका आणि मेक्सिकोमध्येही गणपतीच्या मूर्ती आढळतात. तसेच त्याची नित्यनियमाने पूजा, अर्चना करणारे लोकही मोठ्या संख्येत आहेत.
जगातील जवळजवळ प्रत्येक आर्ट गॅलरी आणि संग‘हालयात गणेशाची मूर्ती आढळते. हिंदू धर्माचे अनुयायी नसले तरी जगातील अनेक लेखक, कलाकार, उद्योजक यांच्या संग‘ही विघ्नहर्त्या गजाननाची प्रतिमा आहे. अनेक युरोपियन देशांमधील नागरिकांच्या घरी देखील श्रीगणेशाची प्रतिमा असल्याचे आढळून आले होते. भारतीय संस्कृतीचा विश्वसंचारच यातून प्रतिबिंबित होतो.