धडगाव प्रतिनिधी : येथे वन विभागाच्या वतीने धडक कारवाई करत बेकायदेशीररित्या सागवानी लाकडाच्या खाटा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडून एक लाख किंमतीच्या २४ खाटा जप्त करण्यात आल्या.
धडगाव बाजाराच्या दिवशी सागवानी लाकडाच्या खाटा मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी येत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. या घटनेची दखल घेत वन विभागाने कारवाई करीत शहरातील स्टेट बँकेसमोर सागवानी लाकडापासून तयार २४ खाटा विक्रेत्यांकडून ताब्यात घेतल्यात. वन विभागाच्या या धडक कारवाईमुळे अवैध लाकडी वस्तू बनविणाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. वन विभागाने जप्त केलेल्या खाटांचा पंचनाम्याचे काम सुरु होते. या प्रकारे धडक कारवाई सुरु ठेवण्यात येणार असल्याचे वन विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.