वैमानिकाला हृदयविकाराचा झटका

    दिनांक : 28-Aug-2021
Total Views |
- बांगलादेशच्या विमानाचे इमरजन्सी लॅण्डींग
 
नागपूर : मस्कत ते ढाक्का या मार्गावर प्रवास करीत असलेल्या बांगलादेश एअरलाईन्सच्या विमानाच्या वैमानिकाला अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने हे विमान आकस्मिकरित्या नागपुरात उतरविण्यात आले आणि वैमानिकाला शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
viman_1  H x W: 
 
बांगलादेश एअरलाईन्सचे विमान मस्कत येथून ढाक्का येथे जाण्यासाठी सकाळी रवाना झाले पण या विमानाचा वैमानिक नौशाद अत्ताऊल क्वालाईम यांची प्रकृती अचानक बिघडली, त्यांच्या छातीत दुखू लागले, त्यामुळे सहवैमानिकाने कोलकाता एटीसी सोबत संपर्क करुन मेडिकल इमरजन्सी लॅण्डींग करण्याची परवानागी मागितली पण विमानाचा प्रवास सुरू असल्याने हे विमान नागपूर शहराजवळ होते, ही बाब हेरुन एटीसीने त्यांना नागपूर विमानतळावर उतरण्याची परवानगी मागावी अशी सूचना केली, त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, नागपूर एटीसीने नागपुरात उतरण्यासाठी परवानगी दिली आणि सर्व व्यवस्था तयार ठेवली, सकाळी 11.40 च्या सुमारास हे विमान नागपूर विमानतळाच्या धावपट्ठीवर उतरले आणि लगेच वैमानिक नौशाद यांना रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रेल्वेस्थानक परिसरातील किंग्जवे रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 
बांगलादेश एअरलाईन्सचे हे विमान सध्या नागपूर विमानतळावरील अ‍ॅप्रनवर उभे आहे, या विमानात 126 प्रवासी होते. एअर इंडिया सर्विसेस ही एअर इंडियाची सेवादार कंपनी या प्रवाशांना सोयीसुविधा, भोजन उपलब्ध करुन देत आहे. या विमानासाठी बांगलादेशहून दुसरा वैमानिक येणार असून त्यानंतर हे विमान रवाना होणार आहे. रात्री उशीरापर्यंत विमान रवाना न झाल्यास या प्रवाशांची व्यवस्था नजिकच्या हॉटेलमध्ये करण्यात येणार असल्याचे विमानतळ प्रशासनाने सांगितले.