नंदुरबार : आगामी काही दिवसात देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार भारतीचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी सहकार भारती शिवाय शक्य नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले.
उत्तर प्रदेश राज्यातील सहकार भारतीच्या सातव्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन झाले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. आगामी काळात देशातील प्रत्येक राज्यातील सहकार क्षेत्र सक्षम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली कठोर पावले उचलणार असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, सहकार भारतीच्या माध्यमातून देशातील शेतकरी, शेतमजूर यांच्याकरिता सकारात्मक धोरण ठेवून अधिवेशनातून उद्दिष्ट साध्य करण्यात येईल. २७ राज्यातील ६०० जिल्ह्यातून आलेल्या सहकार भारतीच्या कार्यकर्त्यांचे संघटन मोठ्या प्रमाणावर करण्याचे आवाहन योगी आदित्यनाथ यांनी केले. अधिवेशनाचे प्रास्ताविक सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी यांनी केले. सहकार भारतीचा राष्ट्रीय अधिवेशनासाठी नंदुरबार जिल्हा संघटन मंत्री महादू हिरणवाळे यांच्यासह बँक प्रमुख बाळकृष्ण वाणी, उपाध्यक्षा कल्पना पंड्या, अनामिका चौधरी, तसेच शिरपूर येथील दिलीप लोहार, दिलीप चौधरी, सहभागी झाले होते.