गव्हाचा पौष्टीक चिवडा !

खमंग आणि चविष्ट !

    दिनांक : 15-Dec-2021
Total Views |
लहान मुलांसाठी किंवा मोठ्यांना चहासोबत खाण्यासाठी, अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी चिवड्याचा अस्सल खानदेशी प्रकार म्हणजे गव्हाचा चिवडा ! कमी तेलात बनणारा चटपटीत आणि कुरकुरीत असा हा चिवडा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल असा आहे. खास खानदेशी पद्धतीने कसा बनवायचा हा पौष्टीक चिवडा? चला बघूया !
 
gahu_1  H x W:
 
 
साहित्य :
स्वच्छ निवडलेले गहू : १ किलो
मीठ : रुचेल तेवढे
पापडखारः मीठाच्या प्रमाणात
शेंगदाणे : १ वाटी
गोडलिंबाची पाने
बारीक चिरलेली हिरवी मिरची : आवडीप्रमाणे
लसुण : ७-८ पाकळ्या (उभ्या चिरलेल्या)
फोडणीसाठी: जीरं, मोहरी, हळद, तिखट
 
कृती :
प्रथम १ किलो स्वच्छ निवडलेला गहू एक रात्रभर भिजवावा. दुस-या दिवशी सकाळी, तो गहु उपसुन कुकरमधे पाण्यात ४-५ शिट्यांवर शिजवावा. यात काळजी एकच घ्यायची की, गहु जास्त शिजवायचा नाही. फक्त गव्हाचे दाणे उलेपर्यंत शिजवायचा आहे. कुकरमधील गहू ३ ते ४ वेळा थंड पाण्यातून काढावा म्हणजे एकेक दाणा मोकळा होईल. नंतर गव्हातील उरलेले पाणी काढून त्याला आपल्याला रुचेल इतके मीठ व पापडखार चोळून ठेवावे. नंतर हे गहू कपडयावर पसरवून कडक उन्हात वाळवावे. वाळवलेले गहू कोरड्या आणि स्वच्छ डब्यात भरून ठेवावेत. हे असे वर्षभर राहू शकतात. नंतर लागेल तेव्हा, थोडे थोडे काढून कोरड्या कढईत भाजून घ्यावेत. असे भाजत असताना त्यात तेल टाकू नये.
आता चिवडा बनवतांना आख्खे शेंगदाणे थोडे लालसर तळून घ्यावेत. लसूण बारीक चिरून तोही खरपूस तळून घ्यावा. हिरवी मिरची आवडत असली तर तीही बारीक चिरून तळून घ्यावी. यानंतर एका कढईत फोडणीसाठी तेल ठेवून त्यात जिरे, मोहरी, गोडलिंब, थोडे हिंग, हळद, तिखट टाकून त्यात हे भाजलेले गहू परतून घ्यावेत. झाला गव्हाचा पौष्टीक आणि खुसखुशीत चिवडा तयार! फटाफट फस्त आणि चवीला मस्त ! नक्कीच करून बघा.