सावधान, जमिनीतला जिवंतपणा हरवतोय!

जमिन व्यवस्थापन: कात्री येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात उमटला सूर

    दिनांक : 13-Dec-2021
Total Views |
नंदुरबार : भरघोस उत्पन्नाच्या नादात शेतकरी शेतात रसायनांचा भडीमार करत आहे, ज्यामुळे आज जमिनीतील जिवंतपणा हरवत चालला. हा जमिनीतील जिवंतपणा सुपीकता कायम ठेवण्यासाठी जैविक व सेंद्रिय खतांचा अवलंब करणे काळाची गरज आहे, असा इशारा वजा आवाहन जागतिक मृदा दिनानिमित्त कात्री (ता. धडगाव) येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात उपस्थित मान्यवरांनी केले.
 
katri melava_1   
 
जमिनीचे आरोग्य व व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शनासाठी हा मेळावा घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. हेडगेवार सेवा समितीचे उपाध्यक्ष जात्र्या पावरा होते. तर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक संदीप वळवी, कृषी विज्ञान केंद्राचे विषयतज्ञ यु.डी.पाटील, पिक संरक्षण तज्ञ पद्माकर कुंदे, कृषी विभागाचे पी.बी.पाडवी, सरपंच बारकीबाई मोहन वळवी, गणपत वळवी, ग्रामपंचायत सदस्य माकत्या वळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यात कात्री परिसरातील शेतकर्‍यांना जमिनीची आरोग्य पत्रिका वाटप करण्यात आल्या. जमिनीतील जिवाणू वाढीसाठी आवश्यक जैविक घटक, किटकनाशकांची प्रत्यक्ष माहितीही शेतकर्‍यांना देण्यात आली. कृषी विभागाचे पाडवी यांनी शेतकर्‍यांसाठी आखण्यात आलेल्या शासकीय योजनांची माहिती दिली.
 
शेणाचा अंशन् अंश साठवा
महागड्या रसायनांसाठी लाखो खर्च करून माती दुषीत करण्यापेक्षा घरच्या घरी उपलब्ध होणारे शेणखताचा वापर वाढवा,असे आवाहन करीत जात्र्या पावरा यांनी शेणखताचे मुल्य ओळखून त्यांचा अंशन् अंश साठवण्याचा प्रयत्न केल्यास विना खर्चाचे सर्वोत्तम खत मिळेल असे सांगितले. शिवाय शेतीपूरक जोड व्यवसाय करीत आपल्या वैयक्तिक विकासात भर टाकावी, असेही त्यांनी सांगितले.
 
युवा शेतकर्‍यांना पटले गांडूळ खताचे महत्व
सातपुड्यात चढ-उतार अन् दगडगोट्याची जमीन असली तरी ती शेतकर्‍यांना सकस उत्पादन देणारी ठरते. परंतु अलीकडे रसायनांच्या अतिवापरामुळे अवघी माती दुषीत होऊ लागली आहे. यावर सर्वोत्तम पर्याय गांडूळ खतच असल्याचे कात्री परिसरातील युवा शेतकर्‍यांनी ओळखले. त्यानुसार या शेतकर्‍यांनी गांडूळ खताचे मोठे प्रकल्प उभारण्याचा मानस व्यक्त केला. हा मानस शिक्षण क्षेत्रात सेवा देणारे गणपत वळवी यांच्या मनोगतातून मांडण्यात आला.
 
तालुका शेतकरी मेळाव्यासाठी प्रयत्नशिल
कात्री गावांसह परिसरात शेतकर्‍यांसाठी नेहमीच विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यामुळे या भागातील शेतकर्‍यांनी सुधारित शेतीतंत्राचा अवलंब केला, परिणामी पिकांच्या उत्पादनात वाढ झाली. अशाच प्रकारचा विकास धडगाव तालुक्यातील शेतकर्‍यांचा व्हावा यासाठी तालुका स्तरावर शेतकरी मेळावा घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत जिल्हा सहकारी बँकेचे संचालक संदीप वळवी यांनी व्यक्त केले. 
 
 
विश्व जगविणारी माती वाचवा
एका दाण्यापासून शेकडो दाणे मिळवून देणारी पर्यायाने अवघ्या जगाला अन्नधान्य उपलब्ध करून देणार्‍या मातीला वाचविण्यासाठी प्रत्येक शेतकरी दक्ष असावा. रसायनांच्या वाढत्या वापरामुळे खराब झालेली जमीन सुधारण्यासाठी जिवाणू खतांचा वापर करावा. किटकांच्या नियंत्रणासाठी जैविक घटकांचा अवलंब करण्याचे आवाहन पद्माकर कुंदे यांनी केले. तर यु.डी.पाटील यांनी मातीचे परीक्षण करून खतांचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन केले. शिवाय माती परीक्षणाचे अन्य फायदेही त्यांनी पटवून दिले.