न्यूझीलंडचा स्कॉटलंडवर 16 धावांनी विजय

टी-20 विश्वचषक क्रिकेट

    दिनांक : 04-Nov-2021
Total Views |
दुबई : मार्टिन गप्टिलच्या दमदार फलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडने टी-20 विश्वचषकात सुपर-12च्या सामन्यात स्कॉटलंडवर 16 धावांनी रोमांचक विजय नोंदविला. न्यूझीलंडच्या 5 बाद 172 धावांच्या प्रत्युत्तरात स्कॉटलंडला मर्यादित षटकात 5 बाद 156 धावांपर्यंतच मजल मारता आली. न्यूझीलंडने तीन सामन्यातून दुसरा विजय नोंदवित चार गुणांची कमाई केली आहे. गट क्रमांक दोनमध्ये पाकिस्तान आठ गुणांसह अव्वल स्थानावर, तर अफगाणिस्तान (4) व न्यूझीलंड अनुक्रमे दुसर्‍या व तिसर्‍या स्थानावर आहे. स्कॉटलंडचा हा तिसरा पराभव ठरला असून त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
 
cricket_1  H x  
 
 
स्कॉटलंडने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. सलामी फलंदाज मार्टिन गप्टिलने डॅरिल मिचेल (13) चांगली सुरुवात केली, मात्र कर्णधार केन विल्यम्सन शून्यावर पुढे डेव्हॉन कॉनवे एका धावेवरच बाद झाले. त्यानंतर गप्टिल व ग्लेन फिलिप्सने संघाची पडझड थोपवित संघाला 157 धावांचा टप्पा गाठून दिला. याच धावसंख्येवर दोघेही बाद झालेत. गप्टिलचे सात धावांनी शतक हुकले. गप्टिलने 56 चेंडूंत 93 धावांची खेळी केली. यात त्याने 6 चौकार व 7 षट्कार खेचलेत. ग्लेन फिलिप्सने 33 धावांची भर घातली. जेम्स निशाम (10) व मिचेल सॅण्टनरने (2) नाबाद खेळी करीत संघाला 5 बाद 172 धावा रचून दिल्या.
 
विजयासाठी धावांचा पाठलाग करताना सलामी फलंदाज जॉर्ज मुनसे (22), मॅथ्यू क्रॉस (27), रिची बेरिंग्टन (20) थोडीफार झुंज देत संघाच्या आशा जीवंत ठेवल्या. मायकेल लिस्कने नाबाद 42 धावांची खेळी केली, परंतु त्याची खेळी संघाला विजय मिळवून देण्यास पुरेशी ठरली नाही.