नवी दिल्ली : पुढच्या वर्षात १० टीम खेळणार असलेल्या आयपीएल २०२२ चे वेळापत्रक तयार झाले असून या १५ व्या सिझन मध्ये टीम वाढल्याने ६० ऐवजी ७४ सामने खेळले जाणार आहेत. हा सिझन ६० दिवसांपेक्षा अधिक असेल असेही समजते. क्रीक बझच्या रिपोर्ट नुसार ही स्पर्धा २ एप्रिल रोजी सुरु होईल आणि अंतिम सामना ४ किंवा ५ जूनला खेळवला जाईल. यात १० टीम खेळणार आहेत. लखनौ आणि अहमदाबाद या दोन नव्या टीम आहेत. प्रत्येक टीम १४ सामने खेळणार आहे. पैकी ७ सामने होम ग्राउंडवर तर ७ सामने दुसऱ्या ग्राउंडवर खेळले जातील.
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी यावेळचे सर्व सामने भारताचा खेळविले जाणार असल्याचे जाहीर केले आहे. गेली दोन वर्षे ही स्पर्धा युएई मध्ये खेळविली गेली. २०२१ आयपीएलचा दुसरा भाग सुद्धा युएई मध्ये खेळवला गेला होता. या स्पर्धेत पहिला सामना चेन्नई आणि मुंबई इंडियन्स मध्ये होईल अशी शक्यता आहे. गतवर्षी धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने खिताब जिंकला आहे. कोलकाता नाईट रायडर्सला हरवून चेन्नई सुपरकिंग्स ने हा विजय मिळविला होता. यावेळी खेळाडूंच्या लिलावात बदल होणार असून त्यामुळे खेळाचा रोमांच अधिक वाढेल असे म्हटले जात आहे. यावेळचा मेगा ऑक्शन आहे. चेन्नई सुपरकिंग्स कडून धोनी पुन्हा मैदानावर दिसणार आहे. कारण धोनीने काही दिवसापूर्वी आणखी पाच वर्षे क्रिकेट खेळणार असल्याचे संकेत दिले आहेत.