राज्यात अराजकता माजविणार्‍या रझा अकादमीवर बंदी घाला : विहिंप, बजरंग दलाची मागणी

    दिनांक : 18-Nov-2021
Total Views |
नंदुरबार : महाराष्ट्र राज्यातील नांदेड, अमरावती व मालेगांव शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवुन अराजक स्थिती निर्माण करणार्‍यांवर कारवाई करावी आणि चिथावणी देणार्‍या रझा अकादमीवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल नंदुरबार जिल्हाच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांना नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आले.
 
nivedan_1  H x
 
निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, त्रिपुरा राज्यातील कथित घटनांच्या निषेधार्थ भिवंडी, मालेगांव, अमरावती, आणि नांदेड आदी ठिकाणी १२ नोव्हेंबर २०२१ रोजी मोर्चा काढला. यातील काही ठिकाणी मोर्चाच्यावेळी दुकाने फोडुन रस्त्यावरील वाहनांची हानी करुन दंगलसदृश आणि दहशतीचे वातावरण निर्माण केले. त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनांचा संदर्भ देत महाराष्ट्रात बंद पाळणे, मोर्चा काढणे, दुकानांची नासधूस करणे, दहशतीचे वातावरण तयार करणे याचा विश्व हिंदु परिषद बजरंग दल, नंदुरबार निषेध व्यक्त करत आहे. आम्ही राज्यपाल महोदयांकडे अशी मागणी करत आहोत की, राज्यात नांदेड, अमरावती आणि मालेगांव मध्ये मोर्च काढुन दगडफेक केली व दंगलसंदृश्य वातावरण निर्माण केले. तेथील सर्व आयोजक आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच दंगल करणार्‍यांकडून नुकसान-भरपाई घेतली जावी आणि दंगलखोर अशा रझा अकादमीवर तात्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषद बजरंग दल नंदुरबार जिल्हाच्यावतीने करण्यात आली आहे.
 
निवेदनावर प्रखंड अध्यक्ष नंदुरबार दिलीप बोरसे, प्रखंड मंत्री नंदुरबार महेंद्र सोनी, प्रखंड संयोजक बजरंग गोपाळ बुनकर, विश्‍वहिंदु परिषदेचे कोषाध्यक्ष रामचंद्र महेंद्र सोनार, जळगाव सेवा विभाग यादवराव पाटील, सत्संग प्रमुख पुरुषोत्तम काळे, जिल्हा सहमंत्री अजयभाई कासार, प्रांत धर्मप्रसार सहप्रमुख धोंडीराम शिनगर आदींच्या सह्या आहेत.