नंदुरबार : जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणूक-२०२१ व नवरात्रोत्सव दरम्यान समाजकंटक व गुन्हेगारांवर अंकुश राहावा तसेच निवडणूका व सण उत्सव भयमुक्त वातावरणात पार पाडावेत यासाठी खबरदारी म्हणून पोलीस उपमहानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांनी जि.प. व पं.स.च्या निवडणुकीच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा भेटी दरम्यान अवैध शस्त्रांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी देखील स्थानिक गुन्हे शाखेला अवैध शस्त्रसाठा ठेवणार्यांवर कारवाई करणेबाबतचे आदेश दिले होते.
४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना माहिती मिळाली की, धडगाव गावात मुख्य रस्त्यावर एक इसम हा त्याच्या शेती औजार विक्रीच्या दुकानात मानवी जिवितास घातक असलेल्या लोखंडी बनावटीच्या तलवारी बेकायदेशीररीत्या कब्जात बाळगुन आहे. अशी बातमी मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करुन त्यांना तात्काळ धडगांव येथे जावुन खात्री करुन पुढील कायदेशीर कारवाई करणेबाबत सूचना दिल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडगाव येथे जावुन खात्री केली असता धडगाव गावातील मुख्य रस्त्यावर एक इसम पत्र्याच्या टपरी बाहेर संशयास्पद हालचाली करतांना दिसून आला म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेवुन त्याचे नांव गाव विचारले असता संजय कागडा वळवी, वय ३८ वर्षे, रा.कात्रं ता.धडगाव असे सांगितले, त्याच्या मालकीच्या टपरीची झडती घेतली असता तिथे १ लाख २८ हजार रुपये किमतीची २० लहान मोठ्या धारदार तलवारी मिळुन आल्याने संजय कागडा वळवी याचे विरुध्द धडगांव पोलीस ठाण्याला भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणार्या गुन्हेगारांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झालेले असून भविष्यात कोणी अवैध शस्त्र जवळ बाळगल्यास त्यांची गय केली जाणार नाही, असा नंदुरबार जिल्हा पोलीसांकडून इशारा देण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, नंदुरबार पी.आर.पाटील यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीर अधीक्षक विजय पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस हवालदार विनोद जाधव, पोलीस नाईक जितेंद्र अहिरराव, पोलीस अमंलदार अभिमन्यु गावीत. दीपक न्हावी, रमेश साळुके यांनी केली आहे.