नवी दिल्ली : सीमेपलीकडील दहशतवाद निपटून काढण्यासाठी केवळ देशांतर्गतच नव्हे तर गरज पडल्यास शेजारील सीमांमध्ये जाऊनही भारत कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही. पुन्हा एकदा त्यांच्या घरात घुसून कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दिला आहे.
एका कार्यक्रमात बोलताना राजनाथसिंह म्हणाले की, सुरक्षा दलाने मागील काही दिवसांपासून अतिरेक्यांवर जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे. या कारवाईने अतिरेक्यांचे मनोबल नक्कीच तुटले आहे. काश्मिरातून कलम 370 निष्प्रभ केल्यानंतर तेथे फार मोठा हिंसाचार उफाळेल, असे शत्रूदेशांना वाटत होते. प्रत्यक्षात असे काहीच घडले नाही. अतिशय शांततेत ती संपूर्ण कार्यवाही पार पडली आणि खोर्यातील नागरिकांनीही याला सकारात्मक प्रतिसाद दिला. नेमकी हीच शांतता शत्रूला सहन झाली नाही. त्यांनी अस्वस्थतेतून दहशतवादाला पुन्हा खतपाणी घालणे सुरूच ठेवले आणि घुसखोरीही वाढवली.
आता आम्ही त्यांच्याशी चर्चेचा विषयही काढत नाही. कारण दहशतवाद आणि चर्चा सोबत राहू शकत नाही. मागील काही वर्षांपासून आम्ही पाकिस्तानसोबत चर्चा पूर्णत: बंद केली आहे. दहशतवादावर कारवाईची गरज पडली तर आम्ही थेट त्यांच्या देशात घुसूनही हल्ला करू, असे राजनाथसिंह म्हणाले.
मोदी म्हणजे 24 कॅरेट सोने
पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळाबद्दल बोलताना राजनाथसिंह म्हणाले की, मोदी म्हणजे 24 कॅरेटचे शुद्ध सोने आहेत. महात्मा गांधी यांच्यानंतर भारतीय समाज आणि त्यांची मानसिकता समजणारे कदाचित ते एकमेव नेते आहेत. मागील काही काळापासून सातत्याने अनेक समस्या आणि आव्हानांचा सामना त्यांनी केला. त्यांनी ज्या कुशलनेते सरकार चालविले आहे त्याला तोड नाही. त्यांच्या कार्यकुशलतेचा धडा व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी असला पाहिजे, असेही राजनाथसिंह म्हणाले.