नवी दिल्ली : जगातील कार्बन उत्सर्जनाचा वेग विद्यमान स्थितीनुसार कायम राहिल्यास 2065 पर्यंत उष्णता 25 टक्क्यांनी, तर तापमान चार अंश सेल्सिअसने वाढेल, असा अंदाज युरो मेडिटेरॅनियन सेंटर ऑन क्लायमेट चेंज या संशोधन संस्थेने केला आहे. आज शनिवारपासून इटलीतील रोममध्ये होत असलेल्या 16 व्या जी-20 परिषदेच्या पृष्ठभूमीवर ही बाब महत्त्वाची मानली जात आहे.
सुमारे 40 हून अधिक शास्त्रज्ञांनी संशोधनाच्या आधारे सदर अहवाल प्रकाशित केला आहे. तापमानवाढीमुळे भारतात ऊस, गहू, मका आदी पिकांच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज असून, परिस्थिती कायम राहिल्यास 2065 सालापर्यंत तापमान वाढेल. तसेच, 2050 पर्यंत शेतीसाठी पाण्याच्या मागणीत 29 टक्के वाढ होईल. त्याचा परिणाम एकूण उत्पादनावर होणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.
याशिवाय आगामी 30 वर्षांत तापमानवाढ आणि गरम वार्यांमुळे (उष्णता) भयानक असा दुष्काळ पडू शकतो. तसेच, शेतीसाठी आवश्यक पाण्याच्या तुटवड्याचा धोकाही जाणवत आहे. हवामानबदल तज्ज्ञ डॉ. अनिल प्रकाश यांच्यानुसार, तापमानवाढीमुळे हिमालयातील हिमनद्या वितळत असल्याने पावसाच्या प्रमाणात वेगाने बदल दिसून येत आहेत. देशातील काही राज्यांमध्ये 24 तासांत 300 ते 400 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे भारताला आपल्या पायाभूत सुविधांमध्ये लवचिकता आणणे गरजेचे आहे.
अहवालातील काही शक्यता
- हवामानबदलामुळे जंगलांतील आगीच्या घटना वाढतील
- मनुष्यहानी होण्याचा धोका
- अन्नधान्य उत्पादनात घट होण्याचा अंदाज
- मत्स्योत्पादनात मोठी घट होणार
- 2050 पर्यंत 1.80 कोटी लोकांना पुराचा धोका