विराटाचे पाक पत्रकारांना सडेतोड उत्तर...

    दिनांक : 25-Oct-2021
Total Views |
दुबई : आयसीसी टी-२० विश्वचषकात रविवारी पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव केला. या दणदणीत पराभवाने विश्वचषकातील सामन्यांमध्ये पाकिस्तानविरुद्ध कधीही न पराभूत होण्याची भारताची मालिकाही खंडित झाली. टीम इंडियाला पाकिस्तानच्या हातून एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले. विश्वचषकासारख्या स्पर्धेत पाकिस्तानने भारताविरुद्ध पहिल्यांदाच विजय मिळवला आणि सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार विराट कोहलीला निरर्थक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. यानंतर विराट कोहलीने पाकिस्तानी पत्रकारांचीच शाळा घेतली आणि बोलती बंद केली.
 

virat_1  H x W: 
 
 
पाकिस्तानी पत्रकाराने भारतीय कर्णधार विराट कोहलीला विचारले की, त्याने रोहित शर्माच्या जागी ईशान किशनला घ्यायला हवे होते, जो आज चांगल्या फॉर्ममध्ये होता. 'तू कर्णधार असतास तर रोहित शर्माला टी-२० संघातून वगळले असते का?' असा सवाल करत विराट कोहलीने पाकिस्तानी पत्रकाराला फटकारले? यावर पाकिस्तानी पत्रकाराची बोलती बंद झाली आणि तो हसायला लागला. विराटने पुढे उत्तर दिले आणि म्हटले की, जर फक्त वाद निर्माण करायचा असेल तर आधी मला सांगा, मी देखील त्यानुसार उत्तर देईन. पाकिस्तानच्या विजयाने धुंदीत असलेल्या आणखी एक पाकिस्तानी पत्रकाराने विराट कोहलीला विचारले की,'अति आत्मविश्वासामुळे भारत पाकिस्तानकडून हरला आहे का?' भारतीय संघाने आयसीसी टूर्नामेंटमधील पाकिस्तानविरुद्धचे रेकॉर्ड लक्षात घेता पाकिस्तानविरुद्ध जास्त एकाग्रता दाखवली नाही आणि आगामी सामन्यात भारत अधिक एकाग्रतेने खेळेल असे वाटले? विराटने या पाकिस्तानी पत्रकाराला फटकारले आणि म्हणाला, 'जे बाहेरून प्रश्न विचारत आहेत त्यांनी एकदा आमची किट घालून मैदानात यावे. मग त्यांना कळेल की दबाव काय आहे? पाकिस्तानसारखा संघ आपला दिवस असताना कोणालाही हरवू शकतात. विराटने पुढे उत्तर दिले की त्याची टीम कोणत्याही संघाला हलके घेत नाही आणि प्रत्येकाविरुद्ध चांगले खेळण्यासाठी मैदानात उतरते.
का झाला पराभव?
भारतीय कर्णधार विराट कोहली म्हणाला की, पाकिस्तानी गोलंदाज शाहीन आफ्रिदीने चांगली गोलंदाजी केली आणि शाहीनच्या सुरुवातीच्या विकेट्समुळे भारताचे फलंदाज दडपणाखाली होते. शाहीनच्या सुरुवातीच्या षटकांच्या त्या स्पेलमुळे, भारतीय संघाने 20-25 धावा कमी केल्या, जे नंतरच्या पराभवाचे प्रमुख कारण बनले. विराटच्या म्हणण्यानुसार, जेव्हा पाकिस्तान दुसऱ्या डावात खेळत होता, तेव्हा 10 षटकांनंतर दव येत होते, त्यानंतर चेंडू बॅटवर चांगला येत होता आणि गोलंदाजांना पकड घेणे कठीण होते. त्यामुळे संथ चेंडू टाकण्याचे शस्त्रही खराब झाले, त्यामुळे भारताला हा लाजिरवाणा पराभव झाला.