नवी दिल्ली : चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लॅण्डरचे चंद्रावर सहजपणे उतरण्याचा प्रयत्न अपयशी ठरला होता. या घटनेच्या सुमारे 10 महिन्यानंतर आता नवीन माहिती समोर आली आहे. चांद्रयानातील प्रज्ञान रोव्हर अजूनही सुस्थितीत असून, तो पुढेपुढे सरकत असल्याची माहिती छायाचित्रासह समोर आली आहे.
नासाच्या छायाचित्रांचा वापर करून विक्रमचा ढिगारा ओळखणारे चेन्नईचे अभियंता ष्णमुगम् सुब्रमण्यम् यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात् इस्रोला एक ई-मेल पाठवून प्रज्ञान रोव्हर काही मीटर पुढे सरकल्याचा दावा केला आहे. यात त्यांनी नासाने मे महिन्यात जारी केलेल्या छायाचित्रांचा हवाला दिला आहे. प्रज्ञान रोव्हर काही मीटर पुढे सरकला असल्याचे संकेत या छायाचित्रातून मिळाले असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
यावर इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना ते म्हणाले की, आम्हाला याबाबत नासाकडून कोणतीही माहिती मिळाली नाही, पण ज्या अभियंत्याने विक्रमचा ढिगारा ओळखला होता, त्याने आम्हाला याबाबत ई-मेल केला आहे. आमचे तज्ज्ञ यावर अभ्यास करीत आहेत, पण आताच याबाबत काही सांगता येणार नाही.
मे महिन्यात जारी झालेल्या छायाचित्रांवरून प्रज्ञान लॅण्डर अजून सुस्थितीत असल्याचे व तो पुढे सरकला असल्याचे दिसते. रोव्हर पुढे कसा सरकला, हे समजणे गरजेचे आहे, इस्रो याबाबत नेमकी माहिती देईल, अशी अपेक्षा आहे, असे ष्णमुगम् यांनी म्हटले आहे.