अवयवदानात महाराष्ट्राची सर्वोत्तम कामगिरी

    दिनांक : 02-Dec-2019


organ_1  H x W:
 
टीम तभा
जळगाव, 1 डिसेंबर :
अवयवदान हेच ‘श्रेष्ठदान’ असे म्हटले जाते. अवयवदानाचे महत्त्व जाणणार्‍या महाराष्ट्राला यावर्षीचा केंद्र सरकारकडून पुरस्कार मिळाला आहे. 30 नोव्हेंबरला राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त दिल्लीत ‘नॅशनल ऑर्गेन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन’तर्फे (छजढढज) आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्राचा गौरव करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
 
 
असे करता येते अवयवदान
अवयवदान हे जीवनामध्ये अतिशय महत्त्वाचे आहे. मृत शरीरावर अंत्यसंस्कार झाल्यानंतर ते शरीर नष्ट होते. मात्र, याच शरीराचे अवयव दान केल्यास हेच शरीर अनेकांसाठी जीवनदान ठरु शकते. प्रत्येक व्यक्तीसाठी शरीर हे खूप अमूल्य असते. मात्र, प्राणज्योत मालवल्यानंतर ते इतरांसाठी जीवनदान ठरू शकते. त्यासाठी प्रत्येकाने अवयव दान केले पाहिजे. अवयव दान दोन प्रकारे करता येते. जसे - कुठलाही व्यक्ती जिवंतपणी अवयदानाचा अर्ज भरु शकतो. तसेच मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांच्या सहमतीने अवयवदान होऊ शकते.
 
 
शनिवारी राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त ‘नोटो’द्वारे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अवयवदानाच्या चळवळीत योगदान देणार्‍या राज्यांना पुरस्कार देण्यात आला. नोव्हेंबर 2018 ते ऑक्टोबर 2019 यादरम्यान झालेल्या अवयवदानाच्या आकडेवारीनुसार पुरस्कारांचे वितरण झाले. त्याीत अवयवदानात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्राला केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या हस्ते सर्वोत्तम राज्य पुरस्कार देण्यात आला. ’रोटो-सोटो’च्या संचालक डॉ. लोबो गाजिवाला यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
 
 
यावेळी गाजिवाला यांनी सांगितले की, अवयवदानासाठी महाराष्ट्राला सर्वोत्तम राज्याचा पुरस्कार मिळणे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. अवयवदानाविषयी लोकांमध्ये केलेल्या जनजागृतीसाठी आम्ही जे प्रयत्न केले, त्याची ही पावती आहे.
 
अवयवदानातून अनेकांना जीवनदान
अवयवदानामध्ये महाराष्ट्र अव्वल असून दिवसेंदिवस याबाबत जनजागृती होत असल्याने अवयवदानाचे प्रमाण वाढत आहे. पूर्वी रक्तदानासाठी अनेकांची ‘ना’ असायची. परंतु, आता प्रत्येक समजूतदार व आरोग्यप्रेमी व्यक्ती रक्तदान करतो. त्याप्रमाणे अवयवदान करण्याच्या प्रमाणातही वाढत होत आहे. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळते. एका व्यक्तीच्या शरीरातून किडनी, लिव्हर, फुफ्फुस, हृदय, डोळे, हृदयवाहिन्या, त्वचा आदी अवयव दान करता येतात.
 
अशी आहे आजवरची आकडेवारी
‘झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्गनायझेशन सेंटर, मुंबई’ (नढउउ) मध्ये नोव्हेंबर 2018 ते ऑक्टोबर 2019 दरम्यान महाराष्ट्रात झालेले अवयवदान - शरीरातून काढून प्रत्यारोपणासाठी पाठवलेले अवयव - 446, प्रत्यारोपित झालेले अवयव - 449 (इतर राज्यांतून महाराष्ट्रात प्रत्यारोपणासाठी आलेल्या अवयवांचाही समावेश), ब्रेनडेड झालेले रुग्ण - 193, प्रत्यारोपणासाठी अवयवदान केलेले ब्रेनडेड रुग्ण - 153. तसेच 15 नोव्हेंबर 2019 पर्यंत 127 हृदय, 821 किडनी, 360 लिव्हर तर 18 फुफ्फुसं दान केल्याची नोंद आहे. राज्यातील अवयवदानात मुंबई पहिल्या तर पुणे दुसर्‍या क्रमांकावर आहे. तसेच ‘नोटो’ या संस्थेमध्ये सुमारे 2 लाख 34 हजार 974 जणांनी अवयवदानासाठी नोंदणी (प्रतिज्ञा) केली आहे. दरम्यान, या संस्थेमध्ये जळगावमधील अवयवदानाची एकही नोंद नाही.